बच्चू कडू नागपुरात आंदोलन करण्यावर ठाम; तब्बल १५ तासापासून रास्ता रोको

Foto
नागपूर : नागपूरमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र झाले आहे. 'आमची माणसं अडवली तर आम्ही रेल्वेकडे जाऊ,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिला आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी, बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ते संतप्त झाले. आमदार आशिष जयस्वाल यांच्यासोबत चर्चेची शक्यता वर्तवली जात असताना, सरकारने मागण्या मान्य न केल्यास 'रेल रोको' करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे नागपूरमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. 

कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार रुपयांचे मानधन, तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहे. बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

या आंदोलनकर्त्यांनी नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहे. परिणामी  गेल्या 15 तासांहून अधिक काळ अनेक वाहने महामार्गावर अडकून पडले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाने सामान्य जनतेची प्रचंड कोंडी केल्याचे चित्र आहे. 

बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडूनही हालचाली सुरु झाल्या आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने अद्याप शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी, अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही, त्यामुळे जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी, अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली आहे.

बच्चू कडूंच्या मागण्या काय काय?


शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी शर्ती शिवाय त्वरित माफ करावे.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा. पिक कर्जा बरोबरच, मध्यम मुदत, पॉली हाउस, शेड नेट, जमीन सुधारणा, सिंचन सुविधांसह सर्व कर्जाचा कर्जमाफीत समावेश करा.

उसाला सन 2025-26 या वर्षासाठी 9 टक्के रिकव्हरी साठी प्रति टन 4300/- रुपये व वर प्रति एक टक्का रिकव्हरीसाठी 430/- रुपये एफ.आर.पी. द्या. आजवरची थकीत एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांना द्या.
कांद्याला किमान प्रति किलो 40/- रुपये भाव द्या. कांद्यावरील निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य व निर्यात कर कायमस्वरूपी बंद करा. भाव पाडण्यासाठी होत असलेला नापेड व एन.सी.सी.एफ.चा वापर बंद करून या संस्थांचा उपयोग शेतकऱ्यांना कांद्याला रास्त दाम मिळावे यासाठी करा.

दुधाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्या. गायीच्या दुधाला किमान 50/- रुपये बेस रेट व म्हशीच्या दुधाला 65/- रुपये भाव द्या. दुध क्षेत्राला एफ. आर. पी. व रेव्होन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा. दुध भेसळ रोखण्यासाठी ठोस धोरण घ्या.

बच्चू कडू यांच्या 8 मोठ्या मागण्या...


1) शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी.
2) कृषी मालाला हमी भावावर  20% अनुदान देण्यात यावे.
3) शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला स   मान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे.
4) पेरणी ते कापणीचा सर्व खर्च  मधुन करावा.
5) नागपुर - गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा.
6) दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे-
7) मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्‍न मार्गी लावावे
8) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लावावा.


या आंदोलनामुळे नागपूरहैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा दिशेकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाहतूक ठप्प झाल्याने नागपूर शहरातील महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मिहान आणि जामदाकडे जाणाऱ्यांनाही प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत.